COVID-19 (नॉवेल करोना व्हायरस डिसीस), तुमचा समुदाय, आणि तुम्ही – डेटा सायन्सच्या दृष्टिकोनातून

लेखक: ०९ मार्च २०२०, जेरेमी हॉवर्ड आणि रेचेल थॉमस (मराठी भाषांतर – Data Science Team, Fintalk Software Labs)

आम्ही डेटा सायंटिस्ट आहोत – म्हणजेच डेटाचे अर्थपूर्ण विश्लेषण कसे करावे हे आमचे काम आहे. करोना व्हायरस COVID-19 च्या संबंधित डेटाचे आम्ही केलेले विश्लेषण आम्हाला चिंताजनक वाटले. याचा सर्वाधिक धोका समाजातील सर्वात असुरक्षित घटक, वृद्ध आणि गरीब यांना आहेच. परंतु या रोगाचा प्रसार आणि परिणामावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण सर्वांनी आपले आचरण (सवयी) बदलण्याची गरज आहे. आपले हात नियमितपणे आणि स्वच्छ धुवावेत. जमाव, गर्दी अथवा कार्यक्रमास जाणे टाळावे. आणि आपल्या तोंडाला सतत स्पर्श करु नये. या पोस्ट मध्ये आमच्या दृष्टीने चिंतेची, आणि तुम्ही काळजी का करावी याची कारणे आम्ही स्पष्ट केली आहेत. करोना COVID-19 बद्दल थोडक्यात पण महत्वपूर्ण माहितीसाठी आपण ईथन एली (साथीच्या रोगांपासून उद्भवणाऱ्या जोखमी कमी करणारे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या एका सामाजिक संस्थेचे अध्यक्ष) यांचे Corona in Brief वाचू शकता.

 

आपल्याला आवश्यकता आहे तत्पर वैद्यकीय यंत्रणेची

सुमारे २ वर्षांपूर्वी आमच्यापैकी रेचेलला मेंदूचा संसर्ग झाला होता. या रोगामुळे बाधित झालेले सुमारे १/४ लोक मारले जातात तर १/३ कायमस्वरुपी दुर्बल होतात. बर्‍याच जणांची कायमस्वरुपी दृष्टी जाते आणि बहिरेपणा येतो. रेचेल रुग्णालयाच्या वाहनतळापासून जवळपास बेशुद्ध अवस्थेत कशीबशी उपचारासाठी दाखल झाली. नशीब बलवत्तर म्हणून तिचे निदान झाले आणि तातडीने उपचार मिळाले. या घटनेपूर्वी रेचेलची तब्येत अगदी ठणठणीत होती. आपत्कालीन कक्षात त्वरित प्रवेश मिळाल्यानेच तिचे प्राण वाचले.

आता आपण करोनाच्या COVID-19 संदर्भात आणि येत्या आठवड्यात किंवा महिन्यांत रेचेल सारख्या परिस्थितीत असणाऱ्या लोकांचे काय होऊ शकते याबाबत चर्चा करूया. करोना  मध्ये संसर्ग झालेल्या लोकांची संख्या दर ३ ते ६ दिवसांनी दुप्पट होते. याचा अर्थ असा, की संक्रमित लोकांची संख्या तीन आठवड्यांत १०० पट वाढू शकते (हे दिसते तितके सोपे नाही, परंतु तांत्रिक तपशीलांमुळे विचलित होऊ नये). संक्रमित १० पैकी एका जनास अनेक आठवड्यांसाठी रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता असते तसेच यापैकी बहुतेकांना ऑक्सिजनची गरज पडते. या करोना विषाणूचा  अगदी सुरुवातीचा दिवस असला तरी अनेक ठिकाणी रूग्णालये पूर्णपणे ओसंडून वाहत आहेत आणि लोकांना आवश्यक असलेले उपचार मिळणे अशक्य होत आहे (फक्त करोनाच नाही तर इतर अत्यावश्यक उपचारांसाठीही). उदाहरणार्थ, इटलीमध्ये, एका आठवड्यापूर्वी अधिकारी सर्व काही ठीक असल्याचे सांगत होते. त्याच इटलीमध्ये आता संपूर्ण जनतेला लॉक-डाऊन म्हणजेच वेगळे /अलग ठेवले गेले आहे. आणि आता रुग्णांची गर्दी हाताळण्यासाठी यासारखे तंबू उभारले जात आहेत:

A Medical Tent in Italy for COVID-19 screening

इटली मधील आरोग्य तपासणीसाठी उभारलेला एक तंबू

इटलीच्या गंभीर परिणाम झालेल्या एका भागातील, प्रादेशिक आणीबाणी युनिटचे प्रमुख डॉ. अँटोनियो पेसेन्टी म्हणतात, “आता आम्हाला कॉरिडॉरमध्ये, ऑपरेटिंग थिएटरमध्ये आणि रिकव्हरी रूममध्ये आय.सी.यू ची व्यवस्था करावी लागत आहे. जगातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था असणाऱ्या, लोम्बार्डी येथील परिस्थिती  ढासळण्यापासून एक पाऊल दूर आहे.

 

हे फ्लूसारखे नाही

फ्लूमध्ये संसर्ग मृत्यूचा दर सुमारे ०.१% इतका आहे. करोना COVID-19 साठी तो दर १-२% असावा (हार्वर्ड येथील कम्युनिकेबल डिसीस डायनॅमिक्स सेंटरचे संचालक मार्क लिपसिच यांच्या अंदाजे). फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये केलेल्या संसर्ग नमुन्यातील चाचणीमध्ये हाच दर १.६% एवढा आढळला. जो फ्लू-१ च्या तुलनेत सोळा पटीने जास्त आहे [1].  (तथापि हि एक कमी धरलेली संख्या असू शकते, कारण वैद्यकीय यंत्रणा अपयशी होते तेव्हा हा दर वाढण्याची शक्यता असते). सध्याच्या उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम अंदाजांनुसार, करोना COVID-19 या वर्षी फ्लूच्या तुलनेत १० पटीने जास्त लोकांचा बळी घेण्याची शक्यता आहे. (एअरबीएनबीच्या माजी डेटा सायन्स डायरेक्टर एलेना ग्रेवाल यांनी केलेल्या मॉडेलिंग नुसार तर सर्वात वाईट परिस्थितीत हे प्रमाण १०० पट अधिक असण्याची शक्यता आहे.) अर्थात वर नमूद केल्याप्रमाणे  वैद्यकीय प्रणालीवर उद्भवणाऱ्या तणावपूर्ण परिस्थिती पूर्वीचे हे अंदाज आहेत. हे काही नवीन नाही, फ्लू सारखाच एक आजार आहे अशी काही लोक स्वत:चि समजूत काढत आहेत. कारण अपरिचित असणाऱ्या या संसर्गाबद्दल वास्तव स्वीकारणे कठीण आहे.

संक्रमित लोकांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ समजून घेण्यासाठी आपल्या मेंदूला डिझाइन केलेले नाही. म्हणून अंदाज लावण्यापेक्षा आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या याचे विश्लेषण करावे लागेल.

 

Graph of Covid-19 cases outside China

हे २ आठवड्यात, २ महिन्यात कुठे असेल ?

 

फ्लू झालेली प्रत्येक व्यक्ती सरासरी १.३ इतर लोकांना संक्रमित करते. त्याला फ्लूसाठी “R0” म्हणतात. जर R0 १.० पेक्षा कमी असेल तर संसर्ग पसरणे थांबते आणि जास्त असल्यास ते पसरते. चीनबाहेर करोना COVID-19 साठीचा R0 सध्या २-३ इतका आहे. हा फरक अगदी लहान वाटू शकतो, परंतु संक्रमित लोकांच्या २० पिढ्यांनंतर, १.३ R0  चा परिणाम मात्र १४६ संसर्गात होईल, परंतु २.५ R0 चा परिणाम ३६ दशलक्ष संसर्गात होईल! (अर्थात यामध्ये बर्‍याच वास्तविक-जगाच्या प्रभावाचा विचार केलेला नाही, परंतु करोना आणि फ्लू मधील साम्य पाहता, हे एक सापेक्ष चित्रण नक्कीच आहे).

लक्षात घ्या की R0 हा एखाद्या रोगाचा मूलभूत गुणधर्म नाही. हे प्रतिसादावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते आणि हे कालांतराने बदलू शकते [2]. विशेष म्हणजे चीनमध्ये करोना साठीचा R0 मोठ्या प्रमाणात खाली येऊन तो आता १.० वर पोहचतो आहे! कसे काय? कल्पना करणे कठीण होईल अशा मोठ्या प्रमाणात देशपातळीवर उपाययोजना करून. उदाहरणार्थ, मोठमोठी शहरे पूर्णपणे बंद करून आठवड्यातून दहा लाखांहून अधिक लोकांची चाचणी घेण्याची प्रक्रिया विकसित करणे.

सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये (एलोन मस्क यांच्या सारख्या लोकप्रिय व्यक्तींसह)  ‘लॉजिस्टिक’ आणि ‘एक्सपोनेंशिअल’ वाढीमधील फरकाचा गैरसमज आहे. “लॉजिस्टिक” वाढ म्हणजे संसर्ग “एस-आकारात” पसरतो. एक्सपोनेंशिअल वाढ ही कायमच राहू शकत नाही, कारण याचा अर्थ साहजिकच जगात असलेल्या लोकांपेक्षा जास्त लोक संक्रमित असतील असा होतो! म्हणूनच, शेवटी, संसर्ग दर कमी होत जाणे आवश्यक आहे. परिणामी वेळोवेळी एस-आकाराची (सिग्मोइड) वाढ दिसून येते. तथापि, घटणारी संख्या काही कारणांमुळे होते. त्याची मुख्य कारणे अशी आहेत :

 • प्रचंड आणि प्रभावी समुदायाकडून मिळालेला प्रतिसाद, किंवा
 • इतक्या मोठ्या प्रमाणातील लोकांना संक्रमित झाले असतील की तेथे पसरण्यासाठी फार कमी लोक उपलब्ध आहेत.

म्हणूनच, संसर्ग नियंत्रण करण्याचा मार्ग म्हणून लॉजिस्टिक वाढीच्या पॅटर्नवर अवलंबून राहणे तार्किक नाही.

करोनाच्या बाबतीत संसर्ग आणि रुग्णालयात दाखल होण्यामध्ये सामान्यतः 11 दिवसांचा कालावधी जातो. यामुळे, आपल्या स्थानिक समुदायामध्ये करोनाच्या प्रभावाचा अंदाज काढणे कठीण होते. कदाचित हा मोठा कालावधी वाटणार नाही. परंतु जेव्हा आपण त्या काळात संक्रमित झालेल्या लोकांच्या संख्येशी तुलना करतो, तेव्हा याचा अर्थ असा होतो की रुग्णालयात सर्व बेड फुल्ल होईपर्यंत ५-१० पट अधिक रुग्णांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.

आपण लक्षात घेतले पाहिजे की आपल्या स्थानिक क्षेत्रात होणाऱ्या प्राभावासाठी हवामान प्राथमिकरित्या कारणीभूत असू शकते. संभाव्य प्रसाराचा अंदाज लावण्यासाठी केलेल्या तपमान आणि अक्षांश विश्लेषणातून असे लक्षात येते की आजपर्यंत हा आजार सौम्य हवामानात पसरत आहे (दुर्दैवाने सॅन फ्रान्सिस्को जिथे आम्ही राहतो तेथे ही तापमान श्रेणी अगदी योग्य आहे. त्यात लंडनसह युरोपमधील मुख्य लोकसंख्या केंद्र देखील समाविष्ट आहेत.)

 

“घाबरू नका. शांत राहा.” धोरण उपयुक्त नाही

“घाबरू नका. शांत राहा.” उपयुक्त नाही

सोशल मीडियावर काळजी वाढवणारा प्रतिसाद म्हणजे “घाबरू नका” किंवा “शांत रहा”. हे असे म्हणणे उपयुक्त नाही. घाबरणे हा एक योग्य प्रतिसाद आहे असे आमचे म्हणणे नाही. परंतु, “शांत रहा” ही एक लोकप्रिय प्रतिक्रिया आहे (या गोष्टींचा मागोवा ठेवण्याचे  काम असणाऱ्या महामारी रोगतज्ज्ञांमध्ये निश्चितच नाही). कदाचित “शांत रहाणे” काही लोकांना त्यांच्या स्वतःच्या निष्क्रियतेबद्दल चांगले वाटण्यास मदत करते. किंवा ते स्वतःला अंदाधुंद पळणाऱ्या लोकांपेक्षा श्रेष्ठ समजत असावेत.

पण “शांत रहा” हि प्रवृत्ती वेळीच प्रतिसाद देण्यात अपयशी ठरू शकते. चीनमध्ये, कोट्यवधी लोकांना लॉक-डाऊन मध्ये टाकण्यात आले होते आणि अमेरिकेसारखी परिस्तिथी निर्माण होईपर्यंत दोन नवीन रुग्णालये बांधली गेली. इटलीने बरीच प्रतीक्षा केली आणि आजच (रविवारी ८ March रोजी) १६ दशलक्ष लोकांना लॉक-डाऊन  केलेले असतानाही १४९२ नवीन रुग्ण आढळले आणि १३३ नवीन मृत्यूची नोंद झाली. आम्ही केलेल्या संशोधनानुसार, फक्त २-३ आठवड्यांपूर्वी इटलीची परिस्थिती आजच्या अमेरिका आणि यूके प्रमाणेच होती (संक्रमण आकडेवारीच्या बाबतीत).

लक्षात घ्या की या टप्प्यात करोना COVID-19 बद्दल जवळपास सर्व काही अंदाधुंद आहे. आपल्याला संसर्गाची गती किंवा मृत्यूची वास्तविकता माहित नाही, हा व्हायरस पृष्ठभागावर किती काळ कार्यरत राहतो हे ठाऊक नाही, तो उबदार परिस्थितीत टिकतो की पसरतो ते माहित नाही. जे काही आहे ते उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित बांधलेले  सर्वोत्तम अंदाज आहेत. आणि लक्षात घ्या की या माहितीपैकी बहुतेक माहिती चीनमध्ये चिनी भाषेत आहे. चीनमधील परिस्थितीचा उत्तम अंदाज घेण्यासाठी WHO-China Joint Mission on Coronavirus Disease 2019 यांचा उत्कृष्ट अहवाल वाचायला हवा. हा अहवाल चीन, जर्मनी, जपान, कोरिया, नायजेरिया, रशिया, सिंगापूर, अमेरिका आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) मधील २५ राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय तज्ज्ञ संयुक्त मिशन वर आधारित आहे. 

जेव्हा काही प्रमाणात अशी अनिश्चितता असते की कदाचित हा जागतिक साथीचा रोग ठरणार नाही, आणि वैद्यकीय यंत्रणा कोसळल्याशिवाय सर्व काही पार पडेल, तेव्हा ‘काहीही न करणे’ हा उपाय योग्य ठरू शकत नाही. अशा अवस्थेत सर्व काही तार्किक असते आणि ती कोणत्याही धोकादायक परिथितीला तोंड देण्याची योग्य पद्धत नाही. इटली आणि चीन सारखे देश आपल्या अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा काही योग्य कारण असल्याशिवाय बंद ठेवणार नाहीत. संसर्गग्रस्त भागात दिसत  असलेल्या प्रत्यक्ष दुष्परिणामांशी हे सुसंगत नाही. वैद्यकीय यंत्रणा याचा सामना करण्यास असमर्थ ठरत आहे (उदाहरणार्थ, इटली रुग्णांच्या वर्गीकरणासाठी 462 तंबू वापरत असूनही संक्रमित भागातील आयसीयू रूग्णांना हलवावे लागत आहे).

COVID-19 संक्रमणाचा प्रसार टाळण्यासाठी तज्ञांनी पुढीलप्रमाणे काही उपाय सुचवले आहेत: 

 • मोठ्या समूहात आणि गर्दीत जाणे टाळा
 • कार्यक्रमास जाणे रद्द करा
 • शक्य असल्यास घरातूनच आपले काम करा
 • घरात येताना व जाताना किंवा बाहेर असतानाही वारंवार स्वच्छ हात धुवा
 • आपल्या चेहऱ्याला विनाकारण स्पर्श करणे टाळा, विशेषत: घराबाहेर असताना (हे थोडे अवघड वाटेल)
 • वस्तूंचे पृष्ठभाग (टेबल, फरशी) आणि पॅकेजेसचे सॅनिटायझर वापरून निर्जंतुकीकरण करा (व्हायरस पृष्ठभागावर ९ दिवस सक्रिय राहण्याची शक्यता नाकारता येत नाही).

 

हे फक्त तुमच्या स्वतः बद्दल नाही

जर तुमचे वय ५० वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल, तुम्हाला हृदयरोग व रक्तवाहिन्यासंबंधी आजार नसतील, पूर्वी धूम्रपान करत नसाल, किंवा इतर गंभीर आजार नसतील तर करोना COVID-19 व्हायरस संसर्गाने तुमचा मृत्यू होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. असे असले तरीही तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता मात्र आहे आणि तुमच्यामुळे इतरांनाही तो पसरण्याची शक्यता आहे. सरासरी प्रत्येक संसर्गग्रस्त व्यक्ती आणखी दोन लोकांना संक्रमित करतो आणि त्यांच्यामध्ये लगेच लक्षण सहसा दिसत नाहीत. संसर्ग झालेल्या व्यक्ती आप्तेष्टांच्या सहवासात वेळ घालवून त्यांनाही  करोनाचा संसर्ग होण्याचे कारण झाल्या तर प्रचंड पश्चतापच होईल.

जरी आपण ५० वर्षांपेक्षा वृद्ध लोकांशी संपर्क साधत नसाल, तरी आपल्या सहवासात काम करणारे लोक कदाचित गंभीर आजारांनी ग्रस्त असण्याची शक्यता आहे.  संशोधनातून असे अढळले आहे की भेदभावाच्या भीतीने काही लोक कामाच्या ठिकाणी त्यांचे आजार लपवून ठेवतात. आम्ही दोघेही (मी आणि रेचेल) गंभीर आजारांनी ग्रस्त आहोत हे आमच्याशी नियमित संवाद करणाऱ्या लोकांना कदाचित माहित नसेल.

हे फक्त तुमच्या आजूबाजूच्या लोकांबद्दलच नाही तर तुमच्या स्वतःच्या नीतिमत्तेची चाचणी आहे.  या विषाणूचा समाजात संसर्ग रोखण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून समाजाला मोठी मदत करू शकता. झेनिप तुफेकी यांनी त्यांच्या ‘सायंटिफिक अमेरिकन‘ या मासिकात लिहिले आहे: “या विषाणूच्या जवळजवळ अपरिहार्य जागतिक प्रसाराविरोधात लढा देण्यासाठी सज्ज राहणे… ही सर्वात परोपकारी गोष्ट ठरेल”. ती पुढे म्हणते:

आपल्या स्वतःचीच नव्हे तर इतरांचीही आपण काळजी घेतली पाहिजे. साक्षात जगबुडीच समोर असल्यासारखी तयारी आपण करत असू, तरीही या परिस्थितीला समाज म्हणून आपण सामोरे जाऊन उलटवून लावण्याचाच आता पवित्र घ्यायला हवा.  आपल्या शेजार्‍यांसाठी – विशषत: वृद्ध, रुग्णालयात काम करणारे, दीर्घ आजारांनी ग्रस्त असलेले तसेच वेळ आणि संसाधनांच्या अभावमुळे काळजी न घेऊ शकणाऱ्यांसाठी आपण स्वतःची काळजी घ्यायला हवी.

या सर्वाचा आमच्यावर वैयक्तिकरित्या परिणाम झाला आहे. Fast.ai मध्ये वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेला एक महत्वपूर्ण अभ्यासक्रम सॅन फ्रॅन्सिस्को विद्यापीठात मागील आठवड्यात सुरु होणार होता. परंतु मागील बुधवारी (४ मार्च रोजी) आम्ही हा संपूर्ण अभ्यासक्रम ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणारे बहुदा आम्ही पहिलेच असू. विद्यापीठातच हा अभ्यासक्रम सुरु ठेवला असता तर आम्ही शेकडो विद्यार्थ्यांना अनेक वेळेला बंद वर्गामध्ये एकत्र येणासाठी प्रोत्साहित केल्यासारखे झाले असते. ही एक खूप मोठी चूक ठरू शकली असती. परंतु आम्ही आमची नैतिक जबाबदारी स्वीकारून ती चूक होऊ दिली नाही. हा निर्णय आमच्यासाठी निश्चितच निराशाजनक होता. कारण या अभ्यासक्रम तयार करण्यासाठी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसोबत काम केले होते. तसेच जगभरातून या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी येणे अपेक्षित होते [3]

पण आम्हाला कळून चुकले कि अभ्यासक्रम ऑनलाईन करणं हेच अत्यंत योग्य आहे. कारण तसं जर आम्ही केलं नसतं तर हा संसर्ग रोग समाजात पसरवण्यात आमचा हातभार लागला असता. [4]

 

आलेखावरील वक्ररेषा सपाट करण्याची गरज

आपण समाजातील संसर्गाचे प्रमाण कमी करून रुग्णालयांना संक्रमित रुग्ण तसेच नियमित रुग्णांना हाताळण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध करून देऊ शकतो. याचेच ‘वक्ररेषा सपाट करणे’ असे वर्णन केले आहे. ते खालील आलेखामध्ये स्पष्टपणे दाखवले आहे: 

Graph of healthcare system capacity in wake of COVID-19

त्या बिंदीदार रेषेखाली राहणे अतिशय महत्वाचे आहे 

 

अमेरिकेच्या हेल्थ आयटीचे माजी राष्ट्रीय समन्वयक फरझाद मोस्ताशारी म्हणतात : 

“दररोज अशी नवीन प्रकरणे प्रकाशात येत आहेत ज्यामध्ये नवीन रुग्ण प्रवासात एखाद्या ज्ञात रुग्णाशी संपर्कात आलेला नाही. आणि चाचण्यांमध्ये होणारी दिरंगाईमुळे हे प्रमाण वाढणार हे निश्चित. म्हणजेच पुढील २ आठवड्यांत खात्रीशीर बाधित रुग्णांच्या संख्येचा विस्फोट होणार. समाजात झपाट्याने पसरणाऱ्या या संसर्गावर नियंत्रण आणणे म्हणजे आग लागलेल्या घरामध्ये एक एक करून ठिणग्या विझविण्यासारखं आहे. म्हणूनच आता रणनीती बदलण्याची आवश्यकता आहे. आरोग्यसेवा ढासळू न देता संसर्ग रोखावा लागणार आहे. संसर्गाचा फैलाव जर आपण रोखू शकलो, तर रुग्णालयांवरील तणाव कमी होईल आणि लोकांना उपचार मिळू शकतील. परंतु, अनेक केसेस एका वेळीच येऊ लागल्या तर मात्र अनेक गरजू रुग्णांना उपचारास मुकावे लागेल.”

लिझ स्पेट यांनी यासंबंधी एक गणित मांडले आहे : 

अमेरिकेतील रुग्णालयांत १००० लोकांमागे अंदाजे २.८ बेड आहेत. म्हणजेच ३३ कोटी लोकसंख्येसाठी सुमारे १० लक्ष बेड आहे. त्यापैकी ६५% बेड आधीच व्यापलेले  आहेत. यामुळे देशभरात सुमारे ३.३ लक्ष एवढेच बेड उपलब्ध आहेत (नियमित फ्लू हंगाम असल्याने कदाचित कमीच असावेत). जर इटलीप्रमाणे १०% प्रकरणेच गंभीर आहेत असे आपण गृहीत धरले ( COVID-19 करोनाच्या रूग्णांना अनेक आठवडे रुग्णालयात ठेवावे लागते. म्हणजेच रुग्णालयातील बेड अतिशय जलद गतीने करोनाग्रस्त रुग्णांनी भरतील)  या अंदाजानुसार, ८ मे पर्यंत अमेरिकेतील सर्व हॉस्पिटल बेड्स भरल्या जातील. (हे बेड्स करोना सारख्या जलद गतीने पसरणाऱ्या COVID-19 विषाणूने बाधित रुग्णांची काळजी घेण्यासाठी किती सज्ज आहेत हे तर इथे गृहीत धरलेलेच नाही.)

गंभीर प्रकरणांच्या अपूर्णांकाबद्दल दोन घटक जरी आपण चुकलो तरी बेड पुरते भरण्याची वेळ फक्त बदलते. म्हणजेच फार फार तर ही वेळ २० मे पर्यंत पुढे जाऊ शकते. इथे अर्थातच करोना व्यतिरिक्त गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना गृहित धरलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊन एकंदरीतच आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव येण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.

 

समाजाचा प्रतिसाद ठरतो निर्णायक

वरील गणित एकदमच वास्तववादी आहे असे आमचे म्हणणे नाही. चीनने आधीच दाखवून दिले आहे की टोकाची पावले उचलून प्रसार कमी करणे शक्य आहे. यशस्वी नियंत्रणाचे आणखी एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे व्हिएतनाम. इतर उपायांसोबतच, व्हिएतनामने एक देशव्यापी जाहिरात मोहीम (आकर्षक गाण्यासह) त्वरेने सुरु करून लोकांना सावधगिरी व योग्य आचरणाबाबत सूचित केले.

ही केवळ काल्पनिक परिस्थिती नाही – १९१८ च्या फ्लूच्या साथीच्या रोगात हे स्पष्टपणे दिसून आले. अमेरिकेत तेव्हा दोन शहरांमध्ये साथीच्या रोगांबद्दल फारच वेगळे निरीक्षण नोंदवण्यात आले: फिलाडेल्फियाने युद्धासाठी पैसे उभे करण्यासाठी २,००,००० लोकांच्या विशाल परेडचे आयोजन केले. तर सेंट लुईने उलट व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजीपूर्वक प्रक्रिया तयार केल्या आणि त्यातून सामाजिक संपर्क कमी करून सर्व मोठे कार्यक्रम रद्द केले. नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या कार्यवाहीत दाखवल्याप्रमाणे, प्रत्येक शहरात मृत्यूची आकडेवारी कशी होती या आलेखाद्वारे स्पष्ट होईल : 

1918 Flu Graph Philadelphia and St Louis -How to tackle COVID-19 effectively

1918  फ्लू (साथीचा रोग) सर्व देशभर पसरलेल्या रोगाला वेगवेगळ्या प्रतिसादांचा परिणाम

 

फिलाडेल्फियाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली, ती इतक्या पराकोटीला पोचली की मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी पुरेश्या दफनपेट्या आणि शवगृह उपलब्ध झाले नाहीत.

२००९ सालच्या H1N1 या साथीच्यावेळी रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे कार्यवाह संचालक रिचर्ड बेसर म्हणतात की “अमेरिकेत स्वतःचे आणि आपल्या कुटूंबाचे रक्षण करण्याची क्षमता उत्पन्न, आरोग्य सेवा आणि इतर गोष्टींवर अवलंबून असते.” ते पुढे म्हणतात : 

दैनंदिन जीवन आणि आधारभूत सुविधा विस्कळीत होतात तेव्हा वृद्ध आणि अपंग यांना विशिष्ट धोका असतो. सहज आरोग्य सेवा न मिळणाऱ्या ग्रामीण आणि मूळ समुदायांना आवश्यकतेच्या वेळी भयानक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. क्वार्टरमध्ये राहणारे लोक – सार्वजनिक घरे, नर्सिंग होम, कारागृह, निवारा किंवा रस्त्यावर राहणारे बेघर – यांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो, जे आपण वॉशिंग्टन मध्ये यापूर्वीही पाहिले आहे. कमी पगारावर आणि अंग मेहनतीचे काम करणारे कामगार वर्ग अशा संकटसमयी उघड्यावर पडतो. रोजंदारीवर काम करणाऱ्या श्रमिकांना, गरजेच्या वेळी कामातून वेळ काढणे किती कठीण जाते हे त्यांना तुम्ही एकदा  विचारून पहा.

यूएस ब्यूरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स असे दर्शविते की सर्वात कमी उत्पन्न असलेल्या वेतन श्रेणीतील एक तृतीयांशपेक्षा कमी कामगारांनाच आजारासाठी पगारी रजा मिळते:

 

sick leave graph worker community

बर्‍याच गरीब अमेरिकन लोकांना आजारी रजा नाही, म्हणून कामावर जावे लागते.

 

आमच्याकडे (यूएस मध्ये) उत्कृष्ट माहिती उपलब्ध नाही

अमेरिकेतील एक मोठी समस्या म्हणजे अगदी कमी प्रमाणात चाचणी घेतली जात आहे आणि चाचणीचे निकाल योग्यप्रकारे समोर येत नाहीत. म्हणजे खरं काय घडत आहे हेच आपल्याला माहित नाही. पूर्वीचे एफडीएचे आयुक्त, स्कॉट गॉटलिब यांनी स्पष्टीकरण दिले की सिएटलमध्ये व्यवस्थित चाचणी झाली आहे आणि आम्हाला तेथे संसर्ग दिसू लागला आहे: “ करोनाच्या सिएटलच्या उद्रेकाबद्दल आम्हाला लवकर माहित झाले कारण स्वतंत्र शास्त्रज्ञांनी चौकसपणे पाळत ठेवण्याचे काम केले. इतर शहरांमध्ये अशी पाळत ठेवली गेली नाही. त्यामुळे इतर अमेरिकेतील इतर ठिकाणं अद्याप पूर्णपणे सापडले नाहीत. ” अटलांटिक च्या माहिती नुसार, उपराष्ट्रपती माईक पेंस यांनी आश्वासन दिले की या आठवड्यात जवळपास १.५ दशलक्ष चाचण्या उपलब्ध होतील, परंतु संपूर्ण अमेरिकेत २,००० पेक्षा कमी लोकांची चाचणी घेण्यात आली आहे. कोविड ट्रॅकिंग प्रोजेक्टच्या कामकाजावर आधारित अटलांटिकचे रॉबिन्सन मेयर आणि अ‍ॅलेक्सिस माद्रिगल म्हणाले:

आम्ही एकत्रित केलेली आकडेवारी असे दर्शविते की COVID-19 ला अमेरिकेकडून (इतर प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत) मिळालेला मंद प्रतिसाद अत्यंत धक्कादायक आहे. आठ दिवसांपूर्वी सीडीसीने खात्रीशीर माहिती दिली की हा विषाणू युनायटेड स्टेट्समध्ये प्रसारित झाला आहे – आणि तो अशा लोकांना होतो आहे, ज्यांनी परदेश दौरा केला नाही किंवा इतर प्रवाशांच्या संपर्कात आलेले नाहीत. दक्षिण कोरियामध्ये, करोनाचे पहिले प्रकरण आढळताच एका आठवड्यातच ६६,६५० पेक्षा जास्त लोकांची चाचणी घेण्यात आली आणि पुढे एका दिवसात १०,००० लोकांची चाचणी घेण्यात ते त्वरित सक्षम झाले.

समस्येचा एक भाग असा आहे कि हा एक राजकीय मुद्दा बनला आहे. विशेषतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे स्पष्ट केले की त्यांना संक्रमित लोकांची कमीत कमी संख्या पहायची इच्छा आहे. म्हणजेच उत्तम परिणामांपेक्षा, आकडेवारी मध्ये हस्तक्षेप करण्याचे हे उदाहरण आहे. (या विषयावर अधिक माहितीसाठी Ethics of Data Science paper The Problem with Metrics is a Fundamental Problem for AI पाहावा). गूगलचे एआय प्रमुख जेफ डीन, यांनी राजकीय हेतूने प्रेरित अपप्रचाराबद्दल ट्विटरद्वारे चिंता व्यक्त केली:

जेव्हा मी WHO मध्ये  काम करत होतो, तेव्हा मी एचआयव्ही / एड्सच्या साथीच्या आजाराचा जगाला सामना करण्यासाठी तयार केलेल्या ग्लोबल प्रोग्राम ऑन एड्स (आता UNAIDS) चा भाग होतो. तेथील कर्मचारी हे समर्पित डॉक्टर आणि वैज्ञानिक होते. त्या संकटाला तोंड देण्यासाठी मदत करण्यावर त्यांनी जोरदार लक्ष केंद्रित केले. संकटाच्या वेळी, प्रत्येकाला कसा प्रतिसाद द्यावा (देश, राज्य आणि स्थानिक सरकारे, कंपन्या, स्वयंसेवी संस्था, शाळा, कुटुंबे आणि व्यक्ती) याबद्दल योग्य व सुचित निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी स्पष्ट आणि अचूक माहिती आवश्यक आहे. सर्वोत्कृष्ट वैद्यकीय आणि वैज्ञानिक तज्ञांचे म्हणणे ऐकण्यासाठी योग्य ती माहिती आणि धोरणे घेऊन, आपण सर्वजण एचआयव्ही / एड्स किंवा COVID-19 द्वारे निर्माण केलेल्या आव्हानांना सामोरे जाऊ. राजकीय हेतूने प्रेरित अपप्रचारामुळे निर्णायक कार्य हाती न घेता, आपण अशा संसर्गाची तीव्रता अधिक वाढवत आहोत. ही सर्व परिस्थिती उलगडताना पाहणे अतिशय वेदनादायक आहे. 

पारदर्शकतेचा प्रश्न येतो तेव्हा बदल घडविण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कुठेच दिसत नाही. वायर्ड नुसार, आरोग्य व मानव सेवा सचिव अ‍ॅलेक्स अझर एके ठिकाणी बोलताना म्हणाले की , “एखाद्याला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी आरोग्य सेवा अधिकारी किट्स चा वापर करत आहेत. त्या किट्सचा अभाव असणे म्हणजे अमेरिकेत रोगाचा प्रसार आणि तीव्रता याबद्दल महामारीविषयक माहितीचा धोकादायक अभाव आहे, आणि सरकारच्या अस्पष्टतेमुळे तो तीव्र झालेला दिसतो. अझरने सांगितले की आणखी चाचण्या चालू आहेत, गुणवत्ता नियंत्रण प्रलंबित आहे.” 

त्यानंतर ट्रम्प यांनी अझर चे बोलणे मधेच थांबवत म्हणाले, “मला वाटतं, महत्त्वाचे म्हणजे ज्याची चाचणी घेण्याची गरज आहे, त्याला ती मिळते आहे. चाचण्या घेण्यात काहीच गैर नाही आणि सर्वांच्या चाचण्या होत आहेत. ” परंतु उपाध्यक्ष पेंस यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले की हे असत्य आहे. अमेरिकेकडे मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी चाचणी किट नाही.

अमेरिकेपेक्षा इतर देश लक्षणीय वेगाने उपाययोजना करीत आहेत. एसई आशियातील अनेक देश छान परिणाम दर्शवित आहेत.  यामध्ये तैवानचा समावेश आहे. तिथे आता R० ०.३ वर आला आहे. सिंगापूरला तर, ‘मॉडेल फॉर COVID-19′ म्हणून प्रस्तावित केले जात आहे. हे फक्त आशियामध्ये नाही; उदाहरणार्थ, फ्रान्समध्ये १००० पेक्षा जास्त लोकांचे कोणतेही एकत्रीकरण निषिद्ध आहे, आणि तीन जिल्ह्यातील शाळा बंद ठेवलेल्या आहेत.

 

 

निष्कर्ष 

COVID-19 हा एक महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आहे आणि आम्ही रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी जे सर्व काही कार्य करू शकतो ते आपण  सर्व करू. याचा अर्थ:

मोठ्या समूहात आणि गर्दीत जाणे टाळा

कार्यक्रमास जाणे रद्द करा

शक्य असल्यास घरातूनच आपले काम करा

घरात येताना व जाताना किंवा बाहेर असतानाही वारंवार स्वच्छ हात धुवा

आपल्या चेहऱ्याला विनाकारण स्पर्श करणे टाळा, विशेषत: घराबाहेर असताना

टीप: हा लेख अतिशय तत्परतेने सर्वांसमोर येण्यासाठी म्हणुन कदाचित आम्ही क्रेडिट्स देण्याची नेहमीप्रमाणे काळजी घेतलेली नाही. कृपया काही चुकले असल्यास आम्हाला ते कळवा. 

अभिप्राय आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल सिल्वाइन गुगर आणि अ‍ॅलेक्सिस गॅलागर यांचे आभार.

 

तळटीप

 • एपिडेमिओलॉजिस्ट असे लोक आहेत जे रोग प्रसाराचा अभ्यास करतात. मृत्यू आणि R0 यासारख्या गोष्टींचा अंदाज करणे खरोखरच खूप आव्हानात्मक आहे, म्हणूनच याचा अभ्यास करण्यासाठी विशेष असे एक स्वतंत्र क्षेत्र आहे. COVID-19 चे वर्तन कसे आहे हे सांगण्यासाठी जे लोक सामान्य प्रमाण आणि आकडेवारी वापरतात त्यापासून सावध रहा. त्याऐवजी, एपिडेमिओलॉजिस्ट (महामारीशास्त्रज्ञांनी) यांनी  केलेले मॉडेलिंग पहा.
 •  “R0” म्हणजे प्रतिसाद नसताना संसर्ग पसरण्याचा दर. परंतु ही काळजी करण्यासारखी गोष्ट नक्कीच नाही. म्हणून आपण येथे आपल्या परभाषेकडे थोडेसे दुर्लक्ष करू शकतो.
 • त्या निर्णयानंतर, आम्ही ऑनलाईन कोर्स चालवण्याचा मार्ग शोधण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. आम्हाला आशा आहे की ते वैयक्तिक आवृत्तीपेक्षा निश्चित चांगले होईल. आम्ही हे जगातील कोणालाही उपलब्ध करण्यास सक्षम आहोत आणि दररोज व्हर्चुअल अभ्यास आणि प्रकल्प गट चालवित आहोत.
 • आम्ही जीवनशैलीतही इतर बरेच छोटे मोठे  बदल केले आहेत. जसे की जिममध्ये जाण्याऐवजी घरीच व्यायाम करणे, आमच्या सर्व मिटिंग व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे घेणे आणि संध्याकाळचे कार्यक्रम ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो ते रद्द करणे. 


This article is written by Jeremy Harward & Rachel Thomas of Fast.ai  Translated to Marathi Language by Data Science Team from Fintalk Software Labs Pvt. Ltd.
Link to Original Article : https://www.fast.ai/2020/03/09/coronavirus/